पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी निर्माण केली असा आरोप आता टीएमसी अर्थात तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी केला आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर ५० दिवसात सगळे काही सुरळीत होईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला दिले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही नोटाबंदीनंतरची पडझड सावरण्यात आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यात मोदी सरकारला यश आले नाही. त्यामुळेच त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली अशी टीका ब्रायन यांनी केली.

सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये चलन तुटवडा जाणवतो आहे. अनेक एटीएम मध्ये नो कॅशचे फलक लागले आहेत. लोकांना पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी तर नोटाबंदीच्या दिवसात जी परिस्थिती होती तशीच निर्माण झाली आहे. या सगळ्याबाबत भाष्य करताना डेरेक ओ ब्रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे ताशेरे ओढत या आर्थिक आणीबाणीला मोदीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकांना आश्वस्त करत बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण परिस्थितीची समीक्षा केली आहे. देशात चलन तुटवडा नाही. फक्त काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे अडचणी आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरीही टीएमसीने या चणचणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.