पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर १२ दिवसांतच भारताने पाकिस्तानाला हवाई हल्ल्याद्वारे धडा शिकवला. मंगळवारी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली. या कारवाईआधी गेले ११ दिवस पडद्यामागे काय घडले, त्याचा हा तपशील..

१५ फेब्रुवारी
दहशतवादी हल्लय़ानंतर भारतीय ‘एअर चीफ मार्शल’ बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई हल्ल्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सरकारकडून तातडीने मंजुरी देण्यात आली.

१६ ते २० फेब्रुवारी
यानंतर वायुसेना आणि लष्कराने हेरॉन ड्रोनच्या आधारे नियंत्रण रेषेवर(एलओसी) टेहळणी सुरू केली.

२० ते २२ फेब्रुवारी
या दरम्यान भारतीय वायुसेना आणि गुप्तचर संस्थांनी हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठी संभाव्य ठिकाणे निवडली.

२१ फेब्रुवारी
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासमोर पाकवर हल्ला करण्यासाठीच्या संभाव्य ठिकाणांबाबत माहिती देण्यात आली आणि हल्ला करण्यासाठीचे लक्ष निश्चित करण्यात आले.

२२ फेब्रुवारी
भारतीय वायुसेनेच्या १ स्क्वाड्रन ‘टायगर्स’ आणि स्कवाड्रन ‘बॅटल अ‍ॅक्सिस’ला हल्लय़ाच्या मोहिमेसाठी  सज्ज करण्यात आली. याशिवाय मोहिमेसाठी दोन मिराज स्क्वाड्रनमधील १२ जेट निवडण्यात आले.

२४ फेब्रुवारी
पंजाबच्या भटिंडा येथून वॉर्निंग जेट आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून विमानात हवेत इंधन भरण्याचा सराव करण्यात आला.

२५ फेब्रुवारी
ऑपरेशन सुरू करण्यासाठी १२ मिराज विमाने तयार करण्यात आली. स्ट्राइक करण्याआधी मिराजच्या वैमानिकांनी लक्ष्य निश्चित केले. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये लेझर गाइडेड बॉम्बद्वारे (लक्ष्य अचूक साधणारे बॉम्ब) हल्ला करण्यात आला. रात्री ३.२० ते ४ वाजेदरम्यान ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

२६ फेब्रुवारी
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोहीम फत्ते झाल्याबाबत माहिती दिली.