News Flash

हे तर केजरीवाल यांचे प्रचारतंत्र

दरम्यान ‘आप’ने जेटलींना लक्ष्य केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

| December 18, 2015 02:54 am

दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित गैरव्यवहार आरोपांबाबत जेटलींचे प्रत्युत्तर
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित गैरव्यवहारांबाबत आम आदमी पक्षाने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची लागणी लावून धरली असतानाच, जेटली यांनी गुरुवारी या प्रकरणी मौन सोडून आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले. स्वत: आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हे ‘प्रचारतंत्र’ (प्रपोगंडा टेक्निक) असल्याचा प्रत्यारोप जेटली यांनी केला.
दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) १४ वर्षे नेतृत्व करणाऱ्या जेटली यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत काँग्रेस आणि ‘आप’ने जेटलींना लक्ष्य केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या ‘बिनबुडाच्या’ आरोपांना आपण उत्तर देणार नाही, असे यापूर्वी म्हणणाऱ्या जेटली यांनी गुरुवारी मौन सोडताना ब्लॉग लिहून, तसेच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू जोरकसपणे मांडली.
केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने कारवाई केल्यामुळे केजरीवाल हे ‘सतत खोटा प्रचार’ करत आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्यांश नाही. मी ज्या-ज्या पदांवर काम केले, तेथे सचोटीची सर्वोच्च मूल्ये अंमलात आणली असे जेटली म्हणाले. या आरोपांना उत्तर देण्याची आतापर्यंत गरज वाटली नाही, पण आता कुठलाही पुरावा नसलेल्या व गुळमुळीत आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी आपली बाजू मांडण्याची गरज वाटल्याचे त्यांनी सांगितले.
मी क्रिकेट संघटनेचे व्यवस्थापन पाहणे २०१३ सालीच सोडले. अशावेळी २०१४ व २०१५ सालातील काही घटनांचा उल्लेख करून केजरीवाल मला यात ओढू शकत नाहीत. या संघटनेच्या व्यवहारांबाबत एका खासदारांनी विविध सरकारी संस्थांशी सतत पत्रव्यवहार केल्यानंतर यूपीए सरकारने या तक्रारींची चौकशी एसएफआयओकडे सोपवली. त्यांनी सर्व तक्रारींचा तपास करून २१ मार्च २०१३ रोजी सविस्तर अहवाल सादर केला. या संघटनेत काही अनियमितता व तांत्रिक बाबींचे उल्लंघन झाले असले, तरी कुठलाही घोटाळा झालेला नसल्याचे या अहवालात नमूद केले असल्याचे जेटलींनी सांगितले.
या प्रकरणी भाजप खंबीरपणे जेटली यांच्या पाठीशी उभा असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ‘आप’ ठाम
दरम्यान ‘आप’ने जेटलींना लक्ष्य केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी जेटली यांच्या वक्तव्याबाबत असमाधान व्यक्त केले. त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप नाकारणे हे ‘पूर्ण सत्य’ आहे असे म्हणता येईल काय? त्यांच्याविरुद्धचे आरोप अतिशय गंभीर असून ते चौकशीपासू न दूर का पळत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. जेटली यांच्या कार्यकाळात डीडीसीएमध्ये फार मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरप्रकार होऊन बनावट कंपन्यांमार्फत फार मोठय़ा रकमा इतरत्र वळवण्यात आल्या, तसेच चमू निवडीसह इतर बाबींमध्ये अनियमितता झाल्या, असा आरोप ‘आप’ने गुरुवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:54 am

Web Title: this is kejriwals promotion system arun jaitley
टॅग : Arun Jaitley
Next Stories
1 मदन मित्रांना ३१ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी
2 प्रदूषणामुळे चीनमध्ये शुद्ध हवेच्या बाटल्यांची विक्री जोरात
3 एच१बी व्हिसा महागला
Just Now!
X