राजस्थानातील अल्वर जिल्ह्यात गायीची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने अकबर खान (वय २८) या तरुणाची हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ‘अल्वरमधील घटना म्हणजे मोदींचं क्रूर ‘न्यू इंडिया’ आहे. यात माणुसकीची जागा द्वेषाने घेतली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी सोमवारी केली.

अकबर खान आणि इतर एकजण दोन गायी हरयाणातील त्यांच्या खेड्यात घेऊन जात असताना अल्वर जिल्ह्यात लालवंडी परिसरातील जंगलात शुक्रवारी रात्री जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. गायीची तस्करी करत असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला होता. यात अकबर खान या तरुणाचा मृत्यू झाला होता. अल्वर जिल्ह्यात जमावाकडून हत्या झाल्याची ही तिसरी घटना असून या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारवर टीका होत आहे. यात भर म्हणजे पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या अकबर खानला रुग्णालयात नेण्यासाठी तीन तास लावले. रुग्णालय सहा किलोमीटर अंतरावर असताना पोलिसांना तीन तास लागल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

अल्वरमधील घटनेवरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, ‘पोलिसांना अकबर खानला रुग्णालयात नेण्यासाठी तीन तास लागले. सहा किलोमीटरवरील रुग्णालयात जाण्यासाठी तीन तास लागले. याचे कारण काय ?, तर पोलीस चहा पिण्यासाठी थांबले होते. हा मोदींचा क्रूर ‘न्यू इंडिया’ असून इथे माणुसकीची जागा द्वेषाने घेतली आहे. इथे माणसांना ठेचले जाते आणि त्यांना मरणासाठी सोडून दिले जाते, असा आरोप त्यांनी ट्विटरवर केला आहे.

दरम्यान, एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली आहे. मला पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल आश्चर्य वाटत नाही. राजस्थानमधील पोलीस स्वयंघोषित गोरक्षकांना पाठिंबा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.