काँग्रेस – तेलगू देसम पक्ष आणि भाजपाने अन्य पक्षांसोबत केलेल्या युतीवरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. ‘हे महाकुटुंबी (युती) नाही. ही २०१८ मधील ईस्ट इंडिया कंपनीच आहे, अशा शब्दात ओेवेसींनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे.

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओेवेसी यांनी रविवारी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मध्य प्रदेशमधील निवडणुकीत २०० जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तर गुजरातमध्येही त्यांनी ३० ते ४० जागा लढवल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या अहमद पटेलांविरोधात मतदान केले होते. पण राहुल गांधी राष्ट्रवादीवर टीका करत नाही. कारण ते शरद पवार आहेत. पण ते माझ्यावर टीका करतात. कारण माझे नाव ओवेसी आहे, असा आरोप त्यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना संधी मिळणे कठीण आहे. पुढील पंतप्रधान हे प्रादेशिक पक्षच ठरवतील. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम एकत्र आल्याने सर्वच पक्ष घाबरलेत, असा दावा त्यांनी केला. तेलंगणात काँग्रेसप्रणित आघाडी किंवा भाजपाप्रणित युती म्हणजे २०१८ मधील ईस्ट इंडिया कंपनीच आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाच्या किंवा दिल्लीतील काँग्रेसच्या इशाऱ्यावर निर्णय घेतील, अशी टीका त्यांनी केली.

तेलगू देसम पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली असून यावरुन ओवेसींनी टीका केली. तेलगू देसमने आता काँग्रेससोबत आघाडी केली आहे. पण मी त्यांना इतकंच विचारतो की अखलाकची जमावाने हत्या केली त्यावेळी ते कुठे होते?, तेलगू देसम पक्ष आधी मोदींच्या मांडीवर बसलेला होता. या देशाला फक्त भाजपा, काँग्रेस नव्हे तर तेलगू देसम पक्षापासूनही वाचवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.