पाकिस्तानातील खैबर पख्तून प्रांतात बालाकोटमध्ये आज (दि.२६) भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दहशतवादविरोधी कारवायांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी भारताकडून पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही लष्करी नव्हे तर दहशतवादविरोधी कारवाई होती, असा सूर निघाला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बैठक बोलावली होती.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आज केलेल्या हल्ल्याला मोठे यश मिळाले. सुरक्षा रक्षकांनी ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे. देशाला अशाच मोठ्या कारवाईची अपेक्षा होती. अखेर २६ फेब्रुवारी हा तो दिवस ठरला. या दिवशी पहाटे साडेतीन वाजता भारतीय हवाई दलाचे १२ मिराज विमाने पीओके आणि खैबर पख्तून या भागात घुसले आणि त्यांनी सुमारे ३०० दहशतवाद्यांना खंठस्नान घातले. मात्र, भारतीय परराष्ट्र सचिवांनी हे स्पष्ट केले की हा हल्ला पाकिस्तानवरील हल्ला नसून जे भारताविरोधात डोळे वटारतात त्यांच्यावर केलेला हा हल्ला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद म्हणाले, सर्वांनी सुरक्षा रक्षकांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. दहशतवादाविरोधात सर्व पक्ष सुरक्षा रक्षकांच्या सोबत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही यशस्वी कारवाई होती. यामध्ये दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचे तळ यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले.