विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना कडवी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तेजस्वी यादव एका अधिकाऱ्याशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा तेजस्वी यादव यांचं नाव चर्चेत आलं असून बिहारमधील भावी नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा पाहिलं जात आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव पाटणा येथे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी आंदोलकांनी आपल्याला ठरलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जात नसल्याचं सांगितलं. तेजस्वी यादव यांनी यावेळी मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि पाटण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आंदोलनाची परवानगी मिळेल असं आश्वासन दिलं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तेजस्वी यादव पाटण्याचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंग यांच्याशी घटनास्थळावरुन फोन केला. यावेळी आंदोलक शिक्षक शेजारीच बसलेले होते. आंदोनल करण्यासाठी परवानगी का दिली जात नाही अशी विचारणा तेजस्वी यादव यांनी यावेळी केली. “त्यांनी रोज परवानगी मागणं अपेक्षित आहे का? त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांचं अन्न फेकून देण्यात आलं, हे सर्व घाबरले आहेत…आता मी त्यांच्यासोबत इको पार्कमध्ये आहे,” असं तेजस्वी यादव फोनवर सांगताना ऐकू येत आहे.

शिक्षकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असंही तेजस्वी यादव यांनी यावेली सांगितलं. पुढे ते म्हणतात की, “मी तुम्हाला यांचा अर्ज व्हॉट्सअप करतो. तुम्ही कृपया यांना परवानगी द्या”. तेजस्वी यादव कधीपर्यंत काम करणार असं विचारलं असता अधिकारी आता तुम्ही मला प्रश्न विचारणार का ? असं म्हणताच तेजस्वी यादव आपली ओळख सांगतातत. यावर लगेचच अधिकाऱ्याचा आवाज बदलतो आणि ओके सर सर..असं सांगत लवकर करु असं आश्वासन देतात.

सुधींद्र कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे.