पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच उत्साह आणि ऊर्जेने भरलेले दिसतात. त्यांच्यामध्ये इतकी ताकत येते कुठून ? असा प्रश्न अनेकांना पडतो. बुधवारी लंडनच्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमामध्ये मोदींना हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोदी म्हणाले कि, मागच्या २० वर्षापासून मी दररोज एक ते दोन किलो शिव्या खात आहे तेच माझ्या ऊर्जेमागचे खरे रहस्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाषण कौशल्याबद्दल प्रश्नच नाही. या प्रश्नावर मोदींनी त्यांच्या खास शैलीत थांबून, प्रेक्षकांकडे पाहून उत्तर देताच प्रेक्षकांनीही तितकीच उत्सफुर्त प्रतिक्रिया दिली. माझ्यावर प्रचंड टीका होते तेच माझ्या फिटनेसचे खरे रहस्य आहे असे मोदी म्हणाले. लंडनच्या वेस्टमिनिस्टर सेंट्रल हॉलमध्ये जवळपास दोन तास हा कार्यक्रम सुरु होता.

१९४६ साली संयुक्त राष्ट्राची पहिली सर्वसाधारण सभा याच सभागृहात झाली होती. हा नेहमीसारखा कार्यक्रम नव्हता. इथे मोदींचे भाषण नव्हते. प्रश्न-उत्तर असे स्वरुप असलेल्या या कार्यक्रमात सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी जनतेच्यावतीने मोदींना प्रश्न विचारले. इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ यांची भेट घेतल्यानंतर मोदी या सभागृहात आले.