04 June 2020

News Flash

भारतातील या शहरांवर अणुबॉम्ब पडल्यास काय होईल?

न्यूकमॅप या अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही एखाद्या शहरावर अणुहल्ला झाल्यास किती किलोमीटरच्या कक्षेत त्याचा परिणाम होईल, हे पाहू शकता.

| August 6, 2015 01:01 am

दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याला आज ७० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर सुदैवाने जगात आजपर्यंत कुठेही अणुहल्ला झालेला नाही. मात्र, तरीही गेल्या काही वर्षांत अनेक राष्ट्रांनी सामरिक रणनितीचा भाग म्हणून गुप्तपणे आपले अणुसंशोधन सुरूच ठेवले आहे. अलीकडच्या काळात हे तंत्रज्ञान दहशतवादी संघटनांच्या हाती लागल्याचेही बोलले जाते. त्यामुळे संपूर्ण जगाच्या डोक्यावर आजही अणुहल्ल्याची टांगती तलवार आहे. त्यादृष्टीने अनेक राष्ट्रांनी उपाययोजना आखल्या असल्या, तरी प्रत्यक्षात अणुहल्ला झाल्यास काय होईल, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अमेरिकेने केलेल्या अणुहल्ल्यात जपानमधील १,२९,००० लोक मृत्युमुखी पडले होते, तर लाखो जणांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यानंतरही जपानमधील अनेक मानवी पिढ्यांनी या अणुहल्ल्याचे दाहक परिणाम भोगले होते. समजा, असाच हल्ला तुमच्या-आमच्या शहरात झाला तर काय होईल, असा प्रश्न अनेकदा चर्चांदरम्यान उपस्थित होत असला तरी त्याबद्दल ठोस असा निष्कर्ष काढता येत नाही. मात्र, आता ‘न्युक्लिअर सिक्रसी’ या संकेतस्थळामार्फत तयार करण्यात आलेले ‘न्यूकमॅप’ हे अॅप्लिकेशनमुळे तुम्हाला अशा प्रकारचा अंदाज लावता येणे शक्य आहे. या अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही एखाद्या शहरावर अणुहल्ला झाल्यास किती किलोमीटरच्या कक्षेत त्याचा परिणाम होईल, हे पाहू शकता.
संबंधित संकेतस्थळावर अणुहल्ला होणाऱ्या ठिकाणाचे नाव, अणुबॉम्बची क्षमता, अणुबॉम्बचा स्फोट हवेत किंवा जमिनीवर होणार, याबद्दलची प्राथमिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या परिसरातील स्फोटाची दाहकता तपासता येईल. यामध्ये तुम्ही जपानमधील शहरांवर हल्ला करताना वापरण्यात आलेल्या क्षमतेचा अणुबॉम्ब ते आता अमेरिकेकडे असणाऱ्या १०० मेगाटन या सर्वोच्च क्षमतेच्या अणुबॉम्बची निवड करू शकता. दरम्यान, या अॅप्लिकेशनद्वारे भारतातील महत्त्वपूर्ण शहरांवर अणुबॉम्ब पडल्यास काय होईल, याचा अंदाज घेऊन पाहिला. पाकिस्तानने भारतावर अशाप्रकारचा हल्ला केला, असे गृहीत धरल्यास सध्या पाकिस्तानकडे असणाऱ्या सर्वोच्च क्षमतेच्या अणुबॉम्बची क्षमता ४५ किलोटन इतकी आहे. या अणुबॉम्बमध्ये २८० मीटरचा परिसर बेचिराख करण्याची क्षमता असून, जमिनीवर या बॉम्बच्या स्फोटामुळे १.१६ किलोमीटरच्या परिसरात किरणोत्साराचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. समजा, या अणुबॉम्बचा स्फोट हवेत झाला, तर जवळपास २.५ किलोमीटरच्या कक्षेतील परिसरावर त्याचा परिणाम होईल आणि ३.०५ किलोमीटरच्या कक्षेतील लोकांना गंभीर इजा होऊ शकते. याउलट, भारताने स्वत:जवळ असणाऱा ६० किलोटन क्षमतेचा अणुबॉम्ब पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर टाकल्यास संबंधित शहरातील ३१० मीटरचा परिसर बेचिराख होईल. तर, १.१६ किलोमीटरच्या परिसरात या स्फोटामुळे किरणोत्साराचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. समजा, हा स्फोट हवेत झाला तर पाकिस्तानी शहरांमधील २.७५ किलोमीटरचा प्रदेश बेचिराख होईल आणि ३.४८ किलोमीटरच्या परिसरातील लोकांना गंभीर स्वरूपाची इजा होईल.

या अॅप्लिकेशनच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतातील या शहरांवर अणुहल्ला झाल्यास काय होईल?

chandigarh
चंदीगढ-
  चंदीगढमधील १ पीएसआयच्या (अणुहल्ल्याची नेमकी तीव्रता ओळखण्यासाठी वापरण्यात येणारे परिमाण) परिसरातील १३,१६,३२६ इतक्या लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी अणुहल्ला झाल्यास २,२८,२२० जण मृत्युमुखी पडतील, तर ४,८९,३४० लोक जखमी होतील.

new-delhi
नवी दिल्ली-
दिल्लीतील १ पीएसआयच्या परिसरातील ३८,२८,८७७ इतक्या लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी अणुहल्ला झाल्यास ३,६७,९०० जण मृत्युमुखी पडतील, तर १२,८५,१८० लोक जखमी होतील.


mumbai
मुंबई-
  मुंबईतील १ पीएसआयच्या परिसरातील ५९,५९, ९२५ इतक्या लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी अणुहल्ला झाल्यास ५,८६,१२० जण मृत्युमुखी पडतील, तर २०,३७,३२० लोक जखमी होतील.

पाकिस्तानमधील या शहरांवर अणुहल्ला झाल्यास काय होईल?

islamabad
इस्लामाबाद-
इस्लामाबादमधील १ पीएसआयच्या परिसरातील ७,७४,३९८ इतक्या लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी अणुहल्ला झाल्यास १,४२,४५० जण मृत्युमुखी पडतील, तर २,६०,०५० लोक जखमी होतील.

(मूळ बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2015 1:01 am

Web Title: this is what a nuclear attack on indian or pakistani cities will look like and it is scary as hell
टॅग Pakistan
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून पाकिस्तानात अल्पवयीन मुलास फाशी
2 कानपूर जिल्हा न्यायालयात स्फोट
3 बिहार अधिवेशनात गदारोळ
Just Now!
X