ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या त्रिपुरातील गेल्या २५ वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून टाकत भाजपाने येथे घवघवीत यश मिळवले. या भागात डाव्यांना आव्हान देणे तितके सोपे काम नव्हते. मात्र, अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येथे मोठे संघटन उभारल्यामुळे डाव्यांना कडवी झुंज देणे भाजपाला शक्य झाले. या विजयामध्ये सुनील देवधर या मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा असून त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले आहेत.

येथील २५ वर्षांपासूनची डाव्यांची सत्ता उलथवून टाकणे भाजपापुढे मोठे आव्हान होते. कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार हे सलग २० वर्षांपासून त्रिपुरात मुख्यमंत्री पदावर होते. त्यांचा कारभार हा स्वच्छ आणि पारदर्शक असला तरी नक्षली कारवायांमुळे येथे मोठा हिंसाचार माजला होता. हाच मुख्य मुद्दा बनवत भाजपाने येथे प्रचार केला आणि सत्ता काबीज केली. मात्र, यासाठी सुनील देवधर यांचे कार्य महत्वाचे मानले जात आहे.

५२ वर्षीय सुनील देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून मुळचे पुण्यातील नारायण पेठेतले आहेत. मात्र, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या परांजपे महाविद्यालयातून झाले. त्यांचे शिक्षण एमएससी बीएड झाले आहे. महाविद्यालयात असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. संघाने त्यांच्यावर २०११ मध्ये शिक्षकाच्या भुमिकेतून त्रिपुराची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी मेघालयमध्ये संघाचे प्रचारक म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर यंदाच्या त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून देवधर हे त्रिपुरात संघाचे काम करीत आहेत. मुंबईत असताना मराठी, हिंदी आणि गुजराती भाषा येत असणारे देवधर यांनी त्रिपुरात काम सुरु केल्यानंतर तिथली स्थानिक भाषा तसेच बंगाली आणि ओडीया भाषाही शिकले आहेत.

दरम्यान, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सुनील देवधर यांच्यावर सोपवण्यात आली होती. तत्पूर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम करीत होते.

त्रिपुराच्या प्रभारी झाल्यानंतर त्यांनी प्रचाराचा भाग म्हणून ‘मोदीदूत योजना’ हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले. या अभियानातंर्गत मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेतून माहिती देणाऱ्या पुस्तिका वितरीत करण्यात आल्या होत्या आणि हीच योजना भाजपाच्या आजच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

त्रिपुरा हे आदिवासी आणि हिंदू धर्मीय बहुसंख्याकांचे राज्य आहे. येथील आदिवासी भागातील मतांसाठी देवधर यांनी जानेवारी महिन्यात आयपीएफटीसोबत आघाडी केली होती. त्याचाही फायदा या निवडणूकीत झाला असून भाजपाला येथे मोठे यश मिळाले.