उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी यांना मराठी समजत नसल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. कारण, महापालिकेच्या महासभेत त्यांनी आपल्याला मराठी येत नसल्याने हिंदीत बोलण्याच्या सूचना नगरसेवकांना दिल्या. त्यांच्या या सूचनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उल्हासनगरच्या महापालिकेत गेल्या आठवड्यात महासभा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरुन चर्चा सुरु होती. मराठीत सुरु असलेली ही चर्चा महापौर पंचम कलानी यांच्या डोक्यावरुन जात होती. त्यांना मराठी समजत नसल्याने चर्चा समजून घेण्यात त्यांना अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी ही चर्चा करणाऱ्या नगरसेवकांना थेट आपल्या मराठी येत नाही, तेव्हा तुम्ही हिंदीत बोला अशी सूचना केली.

महापौर कलानी यांच्या या सुचनेमुळे मुंबईतील उल्हासनगरच्या पालिकेतच मराठी भाषेची उपेक्षा होत असल्याच्या कारणावरुन त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. हिंदीत बोलण्याच्या त्यांच्या या सूचनेमुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा महासभेतील चर्चेचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. त्यावरुन या चर्चेला तोंड फुटले आहे.