भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेचे सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन हे यान अंतराळात झेपावले. चंद्रावर पोहचण्यासाठी या यानाला चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. चांद्रयान-२ मोहिमेत जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियम टाकीत दाब कमी झाल्याने १५ जुलै रोजी ऐनवेळी उड्डाण रद्द करावे लागले होते. त्यानंतर यानाच्या प्रक्षेपणासाठी फार कमी कालावधी उरला होता. या अवघड परिस्थितीत कमी काळात प्रक्षेपकातील बिघाड शोधून काढणे आवश्यक होते. ते काम तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे सध्याचे संचालक डॉ. डी. सोमनाथ यांनी पार पाडले. ते मेकॅनिकल अभियंता आहेत. त्याशिवाय प्रक्षेपण संचालक जे. जयप्रकाश व प्रक्षेपक संचालक रघुनाथ पिल्ले यांनीही हा बिघाड शोधून काढण्यात मोठी भूमिका पार पाडली.

(आणखी वाचा : गौरवास्पद! ‘या’ दोन सुपरवुमन आहेत चांद्रयान-२ मोहिमेच्या शिल्पकार)

चांद्रयान २ मोहिमेत याशिवाय अग्निबाण अभियंता व उपग्रह निर्मितीतज्ञ पी. कुन्हीकृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ते सध्या यू.आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक आहेत. अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीचे डॉ. अनिल भारद्वाज यांचाही यात मोठा सहभाग होता.

दरम्यान, चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान २ ची वैशिष्ट्ये काय?
– चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे
– भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे
– या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही