मोबाईल म्हणजे जीव की प्राण बनलेल्या सध्याच्या युगात अनेकांना थोडावेळदेखील मोबाईलचा विरह सहन होत नाही. केस कापायला सलूनमध्ये गेल्यानंतर अॅप्रनच्या आतमध्ये हात अडकल्यामुळे नाईलाजाने का होईना पण मोबाईल लांब ठेवावाच लागतो. या काळात मोबाईलवर येणारे मेसेजस, फोनची रिंगटोन ऐकून केस कापून घेणाऱ्या व्यक्तीचे लक्ष विचलित होते आणि त्याची अकारण चुळबूळही सुरू होते. केस कापणाऱ्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा निश्चितच त्रास होतो. या समस्येवर आफ्रिकेच्या नैरोबीतील एका केस कापणाऱ्या व्यक्तीने नामी उतारा शोधून काढला आहे. त्याने केस कापताना घालण्यात येणाऱ्या अॅप्रनचा मधला भाग कापून त्याजागी प्लॅस्टिक कव्हर बसवले आहे. त्यामुळे सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांना त्यांचे केस कापतानाही मोबाईलचा वापर करता येणे शक्य झाले आहे. या सलूनमधील केस कापताना मोबाईल वापरणाऱ्या एका व्यक्तीचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत आपल्याकडच्या सलून्समध्ये अशाप्रकारचे अॅप्रन दिसायला लागल्यास नवल वाटायला नको.