अमेरिकी वैज्ञानिकांचे मत
यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरणार असून गेला नोव्हेंबर महिना हा गेल्या १३६ वर्षांतला सर्वात उष्ण ठरला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे कल बघता हे वर्षही इतिहासातील उष्ण वर्षांमध्ये नोंदले जाईल, असे अमेरिकी सरकारच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
नोव्हेंबरशिवाय इतर सात महिन्यातही विक्रमी तापमानाची नोंद झाली असल्याचे नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे एनओएए या संस्थेने त्यांच्या मासिक हवामान अहवालात म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान १.७५ अंश फॅरनहीट (०.९७ अंश सेल्सियस) होते व ते विसाव्या शतकातील सरासरी पृष्ठभाग तापमानापेक्षा अधिक होते. नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान १८८० ते २०१५ या काळातील सर्वाधिक होते. यावर्षी नऊ महिन्यात उष्णतेचा विक्रम मोडला गेला आहे. २०१५ च्या पहिल्या अकरा महिन्यात जगातील जमीन व सागरावरचे तापमान सर्वाधिक होते. २०१५ हे उष्णतेत २०१४ या गेल्या वर्षांला मागे टाकणार आहे. जगात सगळीकडेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान जास्त होते, असे एनओएएचे हवामान वैज्ञानिक जेक क्राउन्च यांनी सांगितले.
आता फक्त डिसेंबरची आशा उरली असून या महिन्यात जर तापमान ०.४३ अंश सेल्यिस राहिले तर या स्थितीत फरक पडू शकतो, कारण एवढे कमी तापमान फक्त १९१६ मध्ये होते, पण ते होणार नाही. त्यामुळे २०१५ हे सर्वात उष्ण वर्षांत गणले जाणार आहे असे क्राउन्च यांनी सांगितले.
त्यांच्या मते एल निनो हा हवामान परिणाम या वेळी जास्त तीव्र असून त्यामुळे तापमान खूप वाढले आहे. तापमानवाढीचा हा क्रम कायम राहील. एल निनोमुळे विषुववृत्तीय प्रशांत प्रदेशात तापमान जास्त असून त्यामुळे जागतिक तापमान वाढते आहे. एल निनो नसलेल्या वर्षांपेक्षा एल निनो असलेल्या वर्षांत तापमान जास्त असते. एनओएए अहवालानुसार विषुववृत्तीय व ईशान्य दक्षिण अमेरिका व आग्नेय आशियाच्या काही भागात उष्णतामान वाढले आहे. जपानमध्ये तुलनेने गेला महिना कमी तापमानाचा होता; तशी स्थिती यापूर्वी १९१० मध्ये होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This november month is the hottest month in history
First published on: 19-12-2015 at 04:26 IST