इंटरनेटवर एकदा लिहिलेली गोष्ट भविष्यात तुमच्यासाठी अडचणीची ठरु शकते असं म्हणतात. असंच काहीसं झालं आहे पाकिस्तानमधील एका व्यक्तीबरोबर. काही वर्षांपूर्वी ट्विटवरून भारतावर टिका करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीने आता ट्विटवरूनच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. डॉ. एम फैजल बुगती असे या व्यक्तीचे नाव आहे. दिल्लीमध्ये उपचार घेण्यासाठी या व्यक्तीला भारतात यायाचे असून त्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात मदतीसाठी त्याने स्वराज यांना ट्विट केले आहे. बुगती यांनी आपल्या ट्विटमध्ये इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्त कार्यालय आणि सुषमा स्वराज यांना टॅग केले आहे. ३१ जानेवारी रोजी मला दिल्लीमध्ये येऊन उपचार घ्यायेच आहेत. त्यासाठी मला तत्काळ व्हिजा हवा असल्याचे नमूद केले आहे. मात्र सध्या भारतीय व्हिजासाठी विनंती करणाऱ्या बुगाती यांनी याआधी भारताविरोधी ट्विट केल्याचे दिसून येते.

२०१४साली केलेल्या एका ट्विटमध्ये बुगती यांनी विकासाबरोबरच भविष्यात भारताच्या भूभागाचे तुकडे होणार असून त्यासाठीही त्यांनी तयार रहायला हवे. पाकिस्तानवर हल्ला करणे व्यर्थ असून असे हल्ले म्हणजे साधन संपत्तीचा अपव्यय आहे असे मत व्यक्त केले आहे. मात्र आता मदतीची गरज असल्याने त्यांची बोलण्याची पद्धत बदलल्याचे दिसून येत आहे.

१९ जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सुषमा स्वराज मॅडम, आमची कागदपत्रे आणि पासपोर्ट इस्लमाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयात दिली आहेत. माझ्या उपचारासाठी डॉक्टरांनी तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे मला तत्काळ व्हिजा मिळण्याची गरज आहे. व्हिजा मिळाला तरच मी ३१ जानेवारीला दिल्लीमध्ये उपचार घेण्यासाठी येऊ शकेल. कृपया उपचारांसाठी मला लवकरात लवकर व्हिजा द्यावा, असे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र या ट्विटला कोणीच काहीही उत्तर न दिल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २० जानेवारी रोजी पुन्हा ट्विट केले. आम्ही एनओसी (ना हरकत पत्र) आणि एक्स कंट्री लीव्हसाठी दहा महिने वाट पाहिली आणि आयव्हीएफसाठी (इन व्हर्टो फर्टीलायझेशन ट्रिटमेन्ट) १३ वर्षे वाट पाहिली आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मेडिकल व्हिजा द्यावा अशी मागणी त्यांनी ट्विटमधून केली आहे.

बुगती यांनी सलग दोन दिवस ट्विट केल्यानंतर सोमवारी परदेश मंत्रालयाने त्यांना इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात जाण्याचा सल्ला दिला असून तेथे तुम्हाला मदत केली जाईल असे आश्वासनही दिले आहे.