बांगलादेशमधील एका फोटोग्राफरला एका जोडप्याचा चुंबन घेतानाचा फोटो पोस्ट केल्याबद्दल मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर हा फोटोग्राफर ज्या वेबसाईटसाठी काम करत होता त्यांनीही त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. सध्या हा फोटो बांगलादेशमध्ये व्हायरल होत असून त्या फोटोग्राफरवर करण्यात आलेल्या कारवाईवरून नेटकऱ्यांचे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.

जीबॉन अहमद नावाच्या तरुण फोटोग्राफरने सोमवारी एक फोटो क्लिक करुन तो सोशल मिडियावर पोस्ट केला. ढाका विद्यापिठामध्ये काढलेल्या या फोटोमध्ये पावसाच्या सरींमध्ये एक जोडपे चुंबन घेताना दिसत आहे. आजूबाजूचे लोक आपल्या कामात असताना हे जोडपे चहाच्या टपरीसमोर पावसात बसून चुंबन घेत असल्याचा हा फोटो अहमदने पाऊस सुरु असतानाच क्लिक केला.

सोशल मिडायावर फोटो शेअर करताना त्याने ‘ही भाग्यवान पावसाची कविताच आहे जणू, प्रेम हे असेच मुक्त असते’ अशी कॅप्शन लिहीली होती. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा फोटो व्हायरल झाला. काही लोकांनी या फोटोची स्तृती केली तर काही लोकांनी या फोटोला राजकीय आणि धार्मिक रंग देऊन फोटोग्राफरवर टिका केली. बांगलादेशमध्ये सध्या बंगाली राष्ट्रवाद आणि इस्लामिक कट्टरपथ्यांमध्ये वाद सुरु असल्याने अनेकांनी हा फोटो आक्षेपार्ह असल्याचे सांगत संस्कृतीला शोभणारा नाही, फोटो काढून टाका अशाप्रकारच्या कमेन्ट केल्या.

इंटरनेटवर सुरु झालेला हा ऑनलाइन वाद काही तासांमध्ये ऑफलाइन म्हणजेच एकदम हाणामारीवर उतरला. फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासांमध्येच इतर फोटोग्राफर्सने ढाका विद्यापिठाच्या आवारातच अहमदला मारहाण केली. तर काही पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद काम करत असणाऱ्या वेबसाईटनेही हे प्रकरण पेटल्यानंतर लगेचच अहमदला नोकरीवरून काढून टाकले आहे.

अहमदवर झालेल्या या कारवाईमुळे अनेकजण संतापले आहेत. ढाका विद्यापिठातील प्राध्यापिका फातिमा धूर्त यांनी ट्विट करुन आपली नाजारी व्यक्त केली. ‘जे लोक महिलांची छेड काढतात त्यांनाच अशाप्रकारे प्रेम आणि मैत्रीचे दर्शन घडवणारे फोटो आक्षेपार्ह वाटतात’ अशा अर्थाचे ट्विट केले आहे. तर देशासमोर इतके गंभीर प्रश्न असताना एका चुंबनावरून एवढा वाद घालणाऱ्यांचा समाचार घेणारे मीम्सही देशात व्हायरल झाले आहेत.

याआधीही झाला होता अहमदवर हल्ला

अहमदने अशाप्रकारे बांगलादेशमधील इस्लामिक विचारसरणीला आव्हन देण्याची हि पहिलीच वेळ नाही. याआधीही अहमदने २०१५ मध्ये बांगलादेशी- अमेरिकन ब्लॉगर असणाऱ्या अविजीत रॉय यांच्यावरील रक्तरंजित हल्ल्याचे फोटो काढले होते. इतक्यावर न थांबता अहमदने जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रॉय आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले. जमलेल्या जमावाकडे मदत मागणाऱ्या रॉय आणि त्यांच्या पत्नीच्या या फोटोने जगभरातील अनेक प्रसारमध्यांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते.