केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडांच्या रक्कमावरून सध्या सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढेच नाहीतर दंडाच्या मोठी रक्कम पाहून धास्तावलेल्या वाहन चालकांवर सध्या सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ देखील फिरत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान व पश्चिम बंगाल या राज्यांनी वाहतूकीचे नियम मोडणाल्याबद्दल आकारली जाणारी नव्या कायद्यानुसारची दंडाची रक्कम ही जास्त असल्याचे सांगत हे नवे नियम लागू करण्यास नकार दर्शवलेला आहे. याच पाठोपाठ आता गुजरात सरकारने देखील नव्या मोटार वाहन कायद्यात बदल करत दंडाची रक्कम जवळपास ५० टक्के कमी करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गुजरातमधील वाहनधारकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गुजरात सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलानुसार आता हेलमेट किंवा सीट बेल्ट न लावल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे, जो अगोदरच्या नियमाप्रमाणे १ हजार रुपये होता. वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास आता दुचाकी वाहनचालकास २ हजार रूपये तर अन्य वाहनधारकांसाठी ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. या अगोदर दंडाची रक्कम पाच हजार रुपये होती. तर नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रिपल सीट वाहन चालवल्यास आकारला जाणारा १ हजार रूपयांचा दंड आता अवघा १०० रुपये करण्यात आला आहे.

चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यास तीनचाकी वाहनधारकास १५०० रुपये, कार चालकास ३ हजार रुपये तर अन्य अवजड वाहनांना ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास गुजरातमध्ये आता वाहनधारकास १५०० रूपये दंड आकारला जाणार आहे. नव्या मोटार वाहन कायद्यात ही रक्कम २ हजार रुपये इतकी होती.