X

दिग्विजय सिंह यांनी सांगितलं का उफाळला ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान हिंसाचार

हे एका शांतीपूर्ण आंदोलनास मलिन करण्याचं सुनियोजित षडयंत्र होतं, असा आरोप देखील केला आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात काल(मंगळवार) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. मात्र या दरम्यान मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उफाळला व ज्यामध्ये ३०० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले. तर, सार्वजिनक मालमत्तेचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं. आंदोलक शेतकऱ्यांकडून लाल किल्ल्यावरील घुमटावर विविध झेंडे लावले गेले. यामुळे शेतकरी आंदोलनास गालबोट लागलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे एका शांतीपूर्ण आंदोलनास मलिन करण्याचं सुनियोजित षडयंत्र होतं.” असा आरोप त्यांनी केला आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले, “शेतकरी संघटना व पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चासाठी तीन मार्ग ठरवण्यात आले होते. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर या मार्गांवरून ट्रॅक्टर रॅली निघाली होती. सिंघू बॉर्डर व टिकरी बॉर्डरवर ट्रॅक्टर रॅलीला काहीच अडचण आली नाही. गाजीपूर बॉर्डर यामुळे अडचण निर्माण झाली, कारण दिल्ली पोलिसांनी जो मार्ग दिला होता, त्यांनी तो बदला व तिथं बॅरिकेड्स लावले गेले होते. शेतकऱ्यांनी जेव्हा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि लाठीमार केला. यामुळे परिस्थिती चिघळली आणि हेच कारण ठरले.”

तसेच, “तुम्ही पाहिलं असेल जी लोकं मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते हिंसक होऊ शकत नाही. यामध्ये कोणती लोकं सहभागी झाली? शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडून दिल्ली पोलिसांकडे सोपवलं आहे. त्यांची नावं समोर यायला हवीत. त्या सर्वांकडे सरकारी ओळखपत्रं आढळली आहेत. आता तुम्ही समजून घ्या सरकार कुणाचं आहे? हे एका शांतीपूर्ण आंदोलनास मलिन करण्याचं सुनियोजित षडयंत्र होतं.” असा आरोप देखील दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

21
READ IN APP
X