विकासाचे राजकारण करणारे नेतेच २०१४च्या निवडणुकीत पुन्हा निवडून येतील, असे भाकीत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी गुरुवारी केले. हैदराबादमधील मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऍंण्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ९२व्या पदवीप्रदान सोहळ्यात एका प्रश्नाला उत्तर देताना कलाम यांनी हे भाकीत केले.
देशातील राजकारण दोन गटांत विभागले गेले असल्याचे कलाम यांनी सांगितले. ते म्हणाले, काही नेते केवळ राजकारणच करतात, तर काही विकासासाठी राजकारणाचा वापर करतात. आपल्या देशात ७० टक्के नेते हे केवळ राजकारणच करतात आणि ३० टक्के विकासासाठी राजकारण करतात. प्रत्यक्षात हे प्रमाण उलटे करण्याची गरज आहे.
काही राज्यांमध्ये आजही राजकारण हे विकासाभोवती फिरते आहे. त्यामुळे तेथील नेते कायम निवडून येतात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विकासाचे राजकारण करणारे निवडून येतील, असे कलाम यांनी सांगितले.