ब्लॅक पँथरचा अफ्रिकेच्या जंगलात शंभर वर्षात पहिल्यांदा दिसून आल्याचा दावा करण्यात आला होता. ब्लॅक पँथर अफ्रिकेच्या जंगलात पाहिला गेल्याची ही १०० वर्षातली पहिली वेळ आहे असं फोटोग्राफर विल बुरार्ड लुकासने म्हटलं आहे. ज्यानंतर या पँथरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर नॅशनल जिओग्राफिक, द डेलि मेल, सीएनएन यांनीही अफ्रिकेच्या जंगलात १०० वर्षात पहिल्यांदाच ब्लॅक पँथर दिसल्याचं म्हटलं आहे. मात्र वॉशिंग्टन पोस्टने हे सगळे दावे खोडून काढत अफ्रिकेच्या जंगलात ब्लॅक पँथर दिसण्याची पहिली वेळ नसल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे.

विल सध्या एका बायोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये ब्लॅक पँथर पाहिल्याची चर्चा होती. चर्चा ऐकल्यानंतर विलने एका सुरक्षित जागेवर हाय क्वालिटी डीएसएलआर कॅमेरा सेट केला होता. विलने कॅमेऱ्यासोबत वायरलेस मोशन सेंसर आणि तीन फ्लॅश लाइट्सचा या उपकरणाचा वापरही केला होता. विलने फोटो काढलेला मादी ब्लॅक पँथर आहे. तसेच हा अफ्रिकेच्या जंगलात १०० वर्षांनी दिसलेला ब्लॅक पँथर आहे असं म्हटलं आहे. मात्र हा दावा वॉशिंग्टन पोस्टने खोडून काढला आहे.

यासाठी २०१३ मध्ये फोएबे ओकालने काढलेल्या एका फोटोचा संदर्भही वॉशिंग्टन पोस्टने दिला आहे. या आधीही ब्लॅक पँथरचे दर्शन सन डीएगो अभयारण्यात झालं आहे त्यामुळे शंभर वर्षात अफ्रिकेच्या जंगलात दिसलेला हा पहिलाच ब्लॅक पँथर आहे या दाव्यात काहीही तथ्य नाही असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे. हे खरे आहे ब्लॅक पँथर दिसणं दुर्मीळ आहे, त्याचे फोटो काढणंही कठीण आहे मात्र या दाव्यात काहीही तथ्य नाही की हा पँथर अफ्रिकेच्या जंगलात पहिल्यांदा दिसला आहे असेही वॉशिंग्टन पोस्टने त्यांच्या बातमीत म्हटलं आहे.