राफेल लढाऊ विमान हे खूपच सुंदर विमान असून ते भारताला अभूतपूर्व अशी लढाऊ क्षमता प्रदान करेल, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे. सध्या देशात या विमानांच्या ५८,००० कोटींच्या खरेदी व्यवहारावरुन बराच गदारोळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर या विमानांचे हवाई दल उपप्रमुखांनी कौतूक केले आहे.

एअर मार्शल एस. बी. देव यांनी म्हटले की, जे राफेल व्यवहारावरुन टीका करीत आहेत त्यांनी या व्यवहारातील नियम आणि खरेदी प्रक्रिया समजून घ्यायला हवी. हे खूपच सुंदर विमान असून त्याची क्षमता प्रचंड आहे, त्यामुळे ही विमाने उडवण्यासाठी आम्ही आतूर झालो आहोत. या जेट विमानांमुळे भारताला मोठा फायदा होणार असून शत्रूच्या कठीण भागांमध्येही त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे.

भारताने फ्रान्सच्या सरकारसोबत ३६ राफेल विमाने विकत घेण्यासंबंधी सप्टेंबर २०१६ रोजी करार केला होता. या सर्व विमानांची एकूण किंमत ५८,००० कोटी रुपये इतकी आहे. सप्टेंबर २०१९मध्ये ही विमाने भारतात दाखल होणार आहेत.

काँग्रेसने या विमान खरेदी प्रकरणी सरकारविरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये विमानाच्या किंमतीचा सर्वात मोठा मुद्दा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, युपीए सरकारच्या काळात पहिल्यांदा हा विमान खरेदीचा व्यवहार झाला होता. त्यावेळी एका विमानाची किंमत ५५० कोटी रुपये होती. मात्र, मोदी सरकारे केलेल्या करारात एका विमानाची किंमत १६०० कोटी रुपये असून ती पूर्वीपेक्षा तिपट्ट आहे.