दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेले शेतकरी चुकीच्या माहिती आणि अफवांचे बळी ठरले आहेत. आपल्या अफवांचा भांडाफोड होऊ नये म्हणून विरोधीपक्षाचे प्रयत्न आहे. त्यामुळे माझ्या भाषणामध्ये अडथळा आणला जात आहे. हे नियोजित षडयंत्र आहे, असा आरोप मोदी यांनी केला. मोदी यांच्या विधानावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू झाला.

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाविषयी भाष्य केलं. “दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करत आहे. ते चुकीच्या माहितीचे आणि अफवांचे बळी ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सरकारला आदर आहे. आदर करत राहिलं. पंजाबमध्ये आंदोलन सुरू असल्यापासून सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे,” असं मोदी म्हणाले.

“यापूर्वी देशात अध्यादेशाच्या माध्यमातून कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आले होते. त्यानंतर संसदेनं या कायद्यांना मंजूरी दिली. हे कायदे लागू केल्यानंतर एकही बाजार समिती बंद झाली नाही. एमएसपी बंद झाली नाही. हे सत्य आहे, जे लपवलं जात आहे. याला काही अर्थ नाही. उलट हे कायदे आणल्यापासून एमएसपीत वाढच झाली आहे. शेतकऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. कृषी कायद्यांवर भरपूर चर्चा झाली. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच सरकारचा हेतू आहे,” असा दावा मोदी यांनी केला.

“दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेले शेतकरी चुकीच्या माहिती आणि अफवांचे बळी ठरले आहेत. आपल्या अफवांचा भांडाफोड होऊ नये म्हणून विरोधीपक्षाचे प्रयत्न आहे. त्यामुळे माझ्या भाषणामध्ये अडथळा आणला जात आहे. हे नियोजित षडयंत्र आहे,” असा आरोप मोदी यांनी केला. मोदी यांच्या विधानावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू झाला. यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली.