रमजानच्या महिन्यांत इफ्तार पार्ट्या आयोजित करणारे नेते ‘मतांचे भिकारी’ आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य एका भाजपा आमदाराने केले आहे. फेसबुक लाईव्हद्वारे तेलंगणातील भाजपा आमदार टी. राजा सिंह लोध यांनी हे विधान केले आहे. या वक्तव्यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.


सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असल्याने तेलंगणातील अनेक आमदार इफ्तार पार्ट्या आयोजनात व्यस्त आहेत. या पार्ट्यांदरम्यान ते गोल टोपी घालून सेल्फी घेताना दिसत आहेत. जर हे आमदार मतपेट्यांचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण असू शकते. मात्र, अशा पार्ट्यांना हजेरी लावणारे लोक ‘मतांचे भिकारी’ असतात. माझे विचार यांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे मी अशा पार्ट्यांना पाठींबा देत नाही, असे लोध यांनी म्हटले आहे.

लोध म्हणाले, हिरवे पुस्तक (कुराण) भारतात दहशतवाद पसरवण्याला जबाबदार आहे. त्यामुळे इस्लाम न माणणाऱ्यांना काफिर म्हणून संबोधणारे हिंदूंच्या कत्तली करण्याची भाषा करतात. त्यामुळे अशांसोबत मी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करीत नाही आणि त्यांना हजेरीही लावत नाही. भारतात दहशतवाद पसरवण्याचे काम करणाऱ्या कुराणवर बंदी आणायला हवी, यासाठी मी लढा देणार आहे.

अखंड हिंदू राष्ट्र, अयोध्येत राम मंदिर उभारणे, देशभरात गोहत्या बंदी तसेच विस्थापित काश्मिरी पंडितांना स्वगृही आणणे हे आपले स्वप्न आहे. जेव्हा जगात ५० पेक्षा जास्त मुस्लिम देश आणि १०० पेक्षा जास्त ख्रिच्शन देश आहेत. तर त्यात एकमेव हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. लोध यांनी पहिल्यांदाच असे वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. तर त्यांना अनेकदा पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याबद्द्ल अटक केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणाऱ्यांचे डोक्याचे तुकडे करायला हवे, असे विधान त्यांनी केले होते.

त्याचबरोबर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरही त्यांनी इफ्तार पार्ट्यांवरुन टीका केली होती. त्यासाठी लोध यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहीले होते की, राव यांना राज्यातील आर्थिक संकटासाठी पैसा नको तर अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी पैसा पाहिजे आहे. तेलंगणा सरकार इफ्तार पार्ट्यांसाठी ६६ कोटी रुपये खर्च करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.