जे बेलवर बाहेर फिरत आहेत, ते जेलमध्ये नक्की जाणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. गुजरात येथील सुरतमध्ये झालेल्या रॅलीत ते बोलत होते. तुम्हाला ठाऊक असेलच की राहुल गांधी सध्या बेलवर मुक्त आहेत. मला हिशेब विचारणारे लोक सध्या बेलवर मुक्त आहेत. त्यांनाही अनेक प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. ऑगस्ट वेस्टलँड, नॅशनल हेरॉल्ड या केसेसमध्ये गांधी कुटुंबीयांचे हात काळे झाले आहेत. ते दोषी ठरतील आणि जेलमध्ये नक्की जातील असाही विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी भ्रष्ट नेते आहेत, त्यांच्या घरात भ्रष्टाचाराची परंपरा आहे. त्यांच्यासारखा माणूस माझ्यासारख्या चहावाल्याला जो आपल्या मेहनतीने पंतप्रधानपदापर्यंत पोहचला आहे त्याला हिशेब कसा मागू शकतात? गेल्या चार पिढ्यापांसून गांधी परिवाराने देश लुटला आहे असाही आरोप मोदींनी केला. त्यांच्या घरण्यापैकी एकानेही विचार केला नसेल की एक दिवस एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होईल आणि प्रश्न विचारेल असंही मोदी म्हटले आहेत.
मी भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरु केली आहे कारण मी एका सामान्य घरातला माणूस आहे. मला कोणाचीही आणि कसलीही भीती नाही. मी भ्रष्ट असतो तर मलाही भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरु करण्यास भीतीच वाटली असती. नोटाबंदीसारखा महत्त्वाचा घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत असंही मोदींनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2019 1:09 pm