जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढत असून देशाचा हा विकास काही लोकांना खुपतोय. म्हणूनच ती लोकं चुकीचा इतिहास मांडून द्वेष पसरवत असल्याचा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. तुम्ही संघटनेपेक्षा स्वतःला मोठे समजू नका, असा इशाराच त्यांनी संघ व भाजपा नेत्यांना दिला.

वाराणसीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीराच्या पाचव्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपा व संघ नेत्यांना संबोधित केले. भागवत म्हणाले, पूर्वी भारतात हिंदू व मुस्लीम असा भेदभाव कधीच नव्हता. दोघेही सुखाने एकत्र नांदत होते. मात्र, इंग्रजांनी १९०५ मध्ये मुस्लीम लीगची स्थापना करत भेदभाव निर्माण केला. समाजात द्वेष पसरवण्यात आला आणि काही लोक अजूनही तेच काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारतात असंतोष पसरवणाऱ्या शत्रूंपासून लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढत असून या विकासामुळे अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच खोटा इतिहास मांडून ही लोकं द्वेष पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात एका वाईट कामापेक्षा २० पटींनी जास्त चांगले काम होत आहे. मात्र प्रचार वाईट कामांचाच केला जातो, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

भागवत यांनी संघ व भाजप नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. संघात व्यक्ती हा संघटनेपेक्षा मोठा नाही. स्वयंसेवकामुळेच संघ घडत गेला आणि यापुढेही अशीच वाटचाल सुरु राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मान- अपमान, यश- अपयश याचा विचार न करता प्रत्येकाने लक्ष्य प्राप्त करणे हेच एक ध्येय ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. संघाचा आता देशभरात प्रसार झाला आहे. आता संघाच्या शाखा प्रत्येक घराघरात पोहोचल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोणताही पंथ, समुदाय किंवा व्यक्ती समाज सेवेचे काम करत असेल तर त्याचा प्रचार आणि मदत केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष डॉ. महेंद्र पांडे, संघटनमंत्री सुनील बन्सल, स्थानिक नेते रत्नाकर यांच्यासह ४४ पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.