‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करणारे हिंदूविरोधी असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ मासिकात करण्यात आला आहे.
दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘महाभारत’मध्ये युधिष्ठिराची भूमिका वठविलेल्या गजेंद्र चौहान यांनी १५० चित्रपट आणि ६०० मालिकांमधून काम केले आहे, त्यांना ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. असे असताना त्यांच्या पात्रतेबाबत शंका घेणाऱ्यांचे मानसिक संतुलन ढळलेले आहे, असेही ‘ऑर्गनायझर’मधील लेखात म्हटले आहे.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी चौहान यांची नियुक्ती केल्यापासूनच काही हिंदूविरोधी शक्तींनी नकारात्मक प्रचार सुरू केला आहे. चौहान यांच्या नियुक्तीला ज्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे त्यांच्यावरही लेखातून जोरदार टीका करण्यात आली
आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते मृणाल सेन हे कट्टर मार्क्‍सवादी आहेत तर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड हे हिंदूंचा तिरस्कार करणारे आहेत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रतिमा भाजपविरोधी आहे, असे आरोपही करण्यात आले आहेत.

२०२० पर्यंत भारत हिंदू राष्ट्र- सिंघल
नवी दिल्ली: भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला २०१४च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले ही देशातील क्रांतीची सुरुवात असून २०२० पर्यंत भारत हिंदू राष्ट्र झालेले असेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी व्यक्त केला आहे. आपण साईबाबांच्या आश्रमात होतो आणि त्यांनी सांगितल्यानुसार २०२० पर्यंत देश हिंदू राष्ट्र होईल तर २०३० पर्यंत संपूर्ण जग हिंदू असेल आणि क्रांतीला सुरुवात झाली आहे असे आपल्याला वाटते, असे सिंघल यांनी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले. माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी सिंघल बोलत होते.