उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. हिंदुत्वला विरोध करणारे विकास आणि भारतीयत्वाविरोधात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

अयोध्येत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरले आहेत. अयोध्येला रवाना होण्यापूर्वी योगी आदित्यनाथांनी पत्रकारांशी संवाद साधला. हिंदूत्व आणि विकास हे परस्परपूरक आहेत आणि हिंदुत्वाला विरोध करणारे हे विकास आणि भारतीयत्वाच्या विरोधात आहेत, असे त्यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांचे भाषण आणि काम हिंदुत्वासाठी असून त्यांनी प्रत्यक्षात विकासकामे केली नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांवर आदित्यनाथ म्हणाले, घराणेशाही आणि जातीयवादाचे राजकारण करणारे आणि ज्यांचे हात भ्रष्टाचाराने माखले आहेत, अशी मंडळी ही टीका करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे इटावाह येथे कृष्णाचा पुतळा उभारणार आहेत. या पुतळ्याची उंची ५१ फूट आहे. इटावाह येथील सैफईत पुतळा तयार करण्यात आला आहे. २०१९ मधील निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी हा पुतळा तयार केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांनी समाजवादीवर निशाणा साधला. ते ‘संस्कार’ कधीच विसरु शकणार नाही, मुलायमसिंह यांनी यापूर्वी दुर्योधनाचा पुतळा उभारला होता, अशी आठवण त्यांनी करुन दिली. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत असून त्यासाठी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून प्रचाराला सुरुवात केली. अयोध्येतून प्रचाराची सुरुवात करण्यात आल्याने विरोधकांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. प्रभू राम आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.