याकुब मेमन मुस्लिम असल्यानेच त्याला फाशी दिली जात आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या या आरोपाला भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. याकुबबद्दल एवढीच सहानुभूती असेल, तर पाकिस्तानात निघून जा, असा सल्ला साक्षी महाराज यांनी ओवेसींना देऊ केला आहे. जो देशाचा, राष्ट्रध्वजाचा, राज्यघटनेचा आणि न्यायालयाचा आदर करत नाही, अशा लोकांना भारतात राहण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांनी पाकिस्तानात निघून जावे, असे साक्षी महाराज संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
मुस्लिम असल्यानेच याकूबला फाशी- ओवेसी
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार याकूब मेमनला सरकार धर्माचा आधार घेऊन फासावर चढवत आहे. राजीव गांधींची हत्या करणारे, बाबरी मशीद पाडणाऱयांच्या मागे राजकीय पक्ष खंबीरपणे उभे आहेत. पण याकुबच्या मागे असा कोणताही राजकीय पक्ष उभा नाही. आरोपींना फाशी द्यायची असेल तर जरुर द्या पण धर्माच्या आधारावर फाशी देण्यात येऊ नये, असे वक्तव्य ओवेसी यांनी केले होते. तमिळनाडूतील दोन मोठ्या राजकीय पक्षांनी राजीव गांधी यांच्या हत्येसाठी दोषी असलेल्यांना फाशी होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.  दया याचिकेवर सुनावणी देण्यात विलंब करण्यात येतो आणि राजीव गांधींच्या मारेकऱयांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात येते. दुसऱया बाजूला याकुबच्या शिक्षेवर मात्र शिक्कामोर्तब होते. एकाच विशिष्ट धर्माला लक्ष्य करणे योग्य नाही, असे ओवेसी म्हणाले होते.