गो रक्षकांवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही भाष्य केले आहे. जे लोक भारताला आपला देश मानतात त्यांनी गायीला मातेसमान वागणूक द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गुजरातमध्ये दलित अत्याचार प्रकरण व इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात गो रक्षकांचा सहभाग नसून गोमांस तस्करी करणाऱ्या समाजकंटकाकडून असे प्रकार होत असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री दास यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गो रक्षकांवर भाष्य केले. ते म्हणाले, गाय ही आपली माता असल्याबाबत संपूर्ण संघ परिवाराचे एकमत आहे. ज्यांना भारत हा आपला देश वाटतो त्यांनी गायीला आपल्या आईप्रमाणेचे वागणूक द्यावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात गो रक्षकांवर टीका केली होती. रात्री काळे धंदे करणारे लोक दिवसा गो रक्षकाचा मुखवटा पांघरून हिंसाचार करत असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या वक्तव्याचा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी समाचार घेतला होता. समाजकंटक म्हणून मोदी यांनी गो रक्षकांचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली होती.
तुम्ही कोणत्याही धर्माचे, जातीचे असा गायीचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. परंतु गायीच्या रक्षणावरून जर तुम्ही हिंसाचार करणार असाल तर ते सहन करण्यासारखे नाही. गायीची तस्करी करणाऱ्यांचाच या हिंसाचारात हात असल्याचे मला वाटते. मतांसाठी काही राजकीय पक्ष असे प्रकार करत आहेत. प्रत्येक घटनेचा मतांसाठी उपयोग करू नये. गायीचे दूध सर्व समाज, धर्मातील लोकांसाठी उपयुक्त आहे. मग असा भेदभाव का केला जातो, असा प्रश्न दास यांनी उपस्थित केला.
झारखंडमध्ये गायीच्या तस्करीबाबत पोलीस प्रशासनाला सक्त सूचना दिल्या असून नुकतेच पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीररित्या गायी घेऊन जाणारे काही ट्रक ताब्यात घेतले होते. गायीच्या तस्करीबाबत राज्यात जनजागृती करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.