वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावला आहे. जे ३० हजार रुपयांचा पिझ्झा खातात त्यांना १२ हजार रुपये पगाराची नोकरी दिसत नाही असे गिरीराज सिंह म्हणाले. आपल्या मंत्रालयाने चार कोटी नोकऱ्यांची निर्मिती केल्याचाही त्यांनी दावा केला. ज्यांना दिसत नाही त्यांना नोकऱ्यांची निर्मिती कशी केली जाते हे मला दाखवायचे आहे. ज्यांनी कधी गरीबी बघितली नाही ते गरीबीबद्दल जाणून घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कलावतीच्या घरी जातात असे गिरीराज सिंह म्हणाले. त्यांचा स्पष्ट इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे होता.

आम्ही चार कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या, हा भाग वेगळा कि, यातल्या ७० टक्के नोकऱ्या या १२ हजारापेक्षा कमी पगाराच्या आहेत. कौशल्याच्या बळावर जगाचा विकास होतो. आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल बोलले असे गिरीराज सिंह म्हणाले. जे ३० हजार रुपयांचा पिझ्झा खातात त्यांना १२ हजार रुपये पगाराच्या नोकऱ्या दिसणार नाहीत. त्यांना फक्त पकोडे दिसतात रोजगार नाही असे गिरीराज म्हणाले.

मुद्रा योजनेतंर्गत उद्योगासाठी कर्ज देण्याबरोबर आपल्या मंत्रालयाने १० कोटी रोजगार निर्मिती केली असा दावा गिरीराज सिंह यांनी केला. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात २०१० ते २०१४ दरम्यान ११ लाख उद्योजक तयार झाले असतील तर आम्ही १६ लाख उद्योजक तयार केले असे गिरीराज सिंह म्हणाले. केव्हीआयसीच्या कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी ही विधाने केली.