गोमांस भक्षणावरून दादरी येथे एकाची ठेचून हत्या केल्याच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रातून टीकेची तोफ डागली आहे. गोहत्या करणारा हा पापी असतो म्हणून त्याला ठार करा, असा आदेश वेदांमध्ये दिला आहे, असा दाखला मुखपत्रातील मुख्य लेखात दिला आहे.

देशातील तमाम मदरशांमध्ये अध्यापन करणारे मौलवी हे तेथील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी द्वेषभावना निर्माण होईल, याचीच शिकवण देतात. दादरी येथील अखलाक याने कदाचित कुकर्मातूनच गायीची हत्या केली असावी, त्यामुळेच त्याला त्याचे प्रायश्चित्त मिळाले. या घटनेवर लेखकांनी मौन का बाळगले, असा सवालही यात करण्यात आला आहे. ‘इस उत्पात के उस पार’ या हिंदी लेखक तुफैल चतुर्वेदी यांनी लिहिलेल्या लेखात वेदांचा संदर्भ दिला आहे. ‘वेदांमध्ये आदेशच आहेत, की गायीला मारण्याचे पातक करणाऱ्याचे प्राण घ्या. आमच्यापैकी बहुतांश जणांसाठी गायीचे संरक्षण हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे..’ असे चतुर्वेदी यांनी लिहिले आहे. ‘लफ्ज’ या नियतकालिकाचे चतुर्वेदी संपादक आहेत. ‘संडे एक्स्प्रेस’शी बोलताना चतुर्वेदी म्हणाले की, गोहत्येच्या घटना रोखणारी अनेक उदाहरणे वेदांमध्ये दिली आहेत. यजुर्वेदात तर गायीला मारणाऱ्याला मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. देशातील बहुसंख्याकांच्या भावनांची कदर करणार नसाल तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायलाच हवी, असेही ते म्हणतात.