धर्माच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करणारेच धर्मविरोधी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शांतीचा आणि सोहार्दतेचा संदेश देणाऱ्या इस्लाम धर्माचे कौतुक केले. जागतिक सुफी फोरमच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातून आलेले सुफी विचारवंत सहभागी झाले आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले, अल्लाच्या ९९ नावांपैकी एकाही नावात हिंसेला स्थान नाही. अल्ला हाच रेहमान आणि रहिम आहे. जे लोक धर्माच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करत आहेत. तेच खरंतर धर्मविरोधी आहेत. दहशतवादामुळे समाजात फूट पडते. दहशतवादी आणि अतिरेकी विचारांचा सध्या आपल्यापुढे मोठा धोका आहे. या स्थितीत सुफी विचारांना जागतिक महत्त्व आहे. दहशतवादाविरोधातील लढा हा कोणत्याही धर्माविरोधात नाही. तसा तो असायलाही नको. हा लढा मानवता आणि अमानवता यांच्यातील आहे. त्यामुळे आपण सर्वांनी दहशतवाद आणि धर्म यांना जोडणे सोडले पाहिजे.
शांततापूर्ण समाजनिर्मितीसाठी केवळ कायदे करून उपयोग नाही. त्यासाठी कायद्यांसोबतच सामाजिक मूल्येही जपली पाहिजेत. ज्यामध्ये प्रत्येकाला त्याच्या भविष्याबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.