“काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन करणारे आज शाहीन बागमध्ये आंदोलन करत आहेत. तिथे ते ‘आझादी’च्या घोषणा देत आहेत” असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर शाहीनबागमधल्या आंदोलकांना बिर्यानी पुरवण्याचा आरोप केला. योगी आदित्यनाथ भाजपाच्या प्रचारासाठी दिल्लीमध्ये आले आहेत.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात १५ डिसेंबरपासून महिला आणि मुलांसह शेकडो लोक शाहीनबागमध्ये आंदोलन करत आहेत. शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या एका युवकाला दिल्ली पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केलं आहे.

“दिल्लीत वेगवेगळया ठिकाणी सुरु असलेली आंदोलनं सीएएसाठी नाहीत. भारताचा जगात प्रमुख देश म्हणून उदय कसा झाला? असा प्रश्न यांना पडला आहे. भारताची प्रगती रोखण्यासाठी हे सर्व चालले आहे” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

“या देशात फक्त हिंदूंची चालणार”
दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शाहीनबागमध्ये गोळीबार झाल्याने दिल्लीत वातावरण तापलं आहे. धक्कादायक म्हणजे शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता “या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाची नाही” असं वक्तव्य केलं. पोलिसांना हा तरुण पूर्व दिल्लीचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.