सांगली : टाळेबंदीमुळे सांगलीत अडकलेल्या १ हजार २०० कामगारांना घेउन श्रमिक रेल्वे रविवारी रात्री मिरजेतून उत्तरप्रदेशातील गोरखपूरला रवाना करण्यात आली. या वेळी या परप्रांतीय मजुरांना सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

टाळेबंदीमुळे उत्तर प्रदेशमधील अनेक मजूर सांगलीत अडकले होते. त्यांच्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने विविध ठिकाणी निवारा केंद्रे उघडली होती. काम बंद असल्याने या मजुरांना घराची ओढ  लगली होती. त्यांच्यासाठी प्रशासनाकडून खास रेल्वेची व्यवस्था करण्यात आली.

मिरज स्थानकावर आज दुपारपासूनच परप्रांतीय कामगारांची लगबग सुरू होती. रात्री आठ वाजता २२ डब्यांची ही श्रमिक रेल्वे गोरखपूरसाठी रवाना करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक डबा ९० प्रवाशांचा असताना त्यामध्ये साथसोवळ्याचे बंधन पाळण्यासाठी आणि प्रवाशांनी सुरक्षित अंतर राखावे यासाठी केवळ ५४ प्रवासी बसविण्यात येत होते. मिरजेतून निघणाऱ्या श्रमिक रेल्वेला कोठेही थांबा असणार नाही. ३० तासानंतर ही रेल्वे गोरखपूर स्थानकावर पोहोचणार आहे.

उत्तर प्रदेशातील मजुरांची रेल्वेत बसण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रेल्वे स्थानकावरही स्क्रििनग करण्यात आले. या  प्रवाशांना प्रवासासाठी लागणाऱ्या तिकिटाची व्यवस्था काँग्रेसच्यावतीने राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली होती. कामगारांना निरोप देत असताना त्यांना रेल्वे तिकीट, भोजन, पाणी बाटली यांचे वितरण या वेळी करण्यात आले. पर प्रांतीय कामगारांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संजय मेंढे यांच्यासह  प्रांताधिकारी समीर ि, तहसीलदार रणजित देसाई, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.