इजिप्तमध्ये इस्लामी अध्यक्ष महंमद मोर्सी यांच्या विरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले असून, हिंसक चकमकीत १६ ठार, तर शेकडो लोक जखमी झाले. दरम्यान, मोर्सी यांना उद्यापर्यंत पद सोडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. इजिप्त देशात प्रथमच आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
कैरो येथे हजारो लोक ताहरीर चौकात जमले होते. याच चौकातून २०११मध्ये लोकशाहीवादी निदर्शनांचे रणशिंग फुंकले गेले होते. तामरोद या लोकशाहीवादी चळवळीची सुरुवात त्या वेळी झाली. मोर्सी यांच्या हकालपट्टीसाठी व मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी सहय़ांची मोहीम सुरू झाली होती. तामरोद चळवळीच्या संकेतस्थळावरील निवेदनात असे म्हटले आहे, की महंमद मोर्सी यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पद सोडावे असा निर्वाणीचा इशारा आम्ही देत आहोत. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुका घेता येतील.
मोर्सी यांनी पद सोडले नाहीतर त्यांना नागरी आज्ञाभंगाच्या आंदोलनास तोंड द्यावे लागेल असेही सांगण्यात आले. विरोधी कार्यकर्त्यांनी असा दावा केला आहे, की देशातील ८.४ कोटी लोकांपैकी २.२ कोटी लोकांनी मोर्सी यांना हटवण्याच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, ताज्या वृत्तानुसार तेथील आंदोलनात सात ठार झाले असून हिंसाचाराचे तुरळक प्रकार सुरू आहेत. नाईल खोऱ्यात पाचजण गोळीबारात ठार झाले असून, मुस्लिम ब्रदरहूडच्या मुख्यालयाबाहेर दोनजण ठार झाले. मोर्सी यांच्या धोरणावर सामान्य इजिप्शियन नागरिक संतप्त असून त्यांनी निषेध मोर्चामध्ये भाग घेतला, आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा या वेळी काढण्यात आला होता. जगाच्या इतिहासात असा निषेध मेळावा किंवा मोर्चा झाला नाही असे जागतिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. अनेक लोकांनी ताहरीर चौकातच रात्र व्यतीत केली. अरब स्प्रिंगमध्ये सुरुवातीला होस्नी मुबारक यांची राजवट संपुष्टात आली होती. मोर्सी यांच्या विरोधकांचे असे म्हणणे आहे, की आर्थिक व सुरक्षाविषयक प्रश्नांवर त्यांची राजवट अपयशी ठरली असून त्यांनी देशहितापेक्षा मुस्लिम ब्रदरहूडच्या कार्यक्रमाला अग्रक्रम दिला. कैरो येथे मोर्सी विरोधकांनी इरहा. इरहा असे लिहिलेले फलक झळकावले. अ‍ॅलेक्झांड्रिया, काफर अल शेख, सिदी सालेम, डामिएटा, घरबिया, सुएझ, शरकिया (मोर्सी यांचे जन्मठिकाण) व इतर शहरांत आंदोलनाने जोर धरला आहे. मोर्सी राजवट संपुष्टात येत नाही तोपर्यंत नॅशनल साल्वेशन फ्रंट आंदोलन सुरूच ठेवणार आहे. मुस्लिम ब्रदरहूडची राजकीय आघाडी असलेल्या फ्रीडम अँड जस्टिस पार्टीने मोर्सी यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. संवाद हाच एक मार्ग आहे, त्यामुळे राजकीय शक्तींनी शांततामय मार्गाने निदर्शने करावीत असे आवाहन अध्यक्षांच्या प्रवक्त्याने केले आहे.