चेन्नई : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात बहुतांश मुस्लिमांसह मोठय़ा संख्येत निदर्शकांनी चेन्नईतील चेपॉक येथे बुधवारी निदर्शने केली. तमिळनाडूच्या निरनिराळ्या भागांतही अशीच निदर्शने करण्यात आली.

राज्यातील मुस्लीम संघटना आणि राजकीय पक्ष यांचा महासंघ असलेल्या ‘तमिळनाडू इस्लामिया इयक्कंगल मातरुम अरासियाल कच्छीगलीन कोट्टामाइप्पु’च्या बॅनरखाली ही निदर्शने करण्यात आली. द्रमुकसह इतर काही पक्षांनीही या निदर्शनांमध्ये भाग घेतला.

दरम्यान चेपॉक येथे ही निदर्शने होत असतानाच, येथून काही किलोमीटर अंतरावरील राज्य सचिवालयातील विधानसभेत मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी उलेमांसाठी (मुस्लीम धर्मगुरू) सेवानिवृत्तिवेतनात वाढीसह मुस्लीम समुदायासाठी कल्याणकारी योजनांची घोषणा केली.

त्यापूर्वी निदर्शकांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी सचिवालयाकडे जाण्याची योजना आखली होती. मात्र त्याऐवजी त्यांनी वल्लाजा मार्गावर मोर्चा काढला. यानंतर मोठय़ा संख्येतील निदर्शकांनी चेपॉकवर एकत्र येऊन भव्य शक्तिप्रदर्शन केले. विधानसभेला घेराव घालण्यास मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी मुस्लीम संघटनांना मनाई केली होती.

सीएए, एनआरसी व एनपीआर यांच्या विरोधातील घोषणाफलकांसह तिरंगी झेंडा हाती घेतलेले निदर्शक सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात घोषणा देत होते. अनेक बुरखाधारी मुस्लीम महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

अ.भा. अण्णा द्रमुकचे वर्चस्व असलेल्या तमिळनाडू विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सीएएच्या विरोधात ठराव करण्यात यावा, अशी या मुस्लीम संघटनांची मागणी आहे. अधिवेशन गुरुवारी संपणार आहे.