कर्नाटकातील कोलारमधील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात शनिवारी हिंसाचार झाला. यामध्ये ४४० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून हजारो आयोफोन्सची लूट करण्यात आली असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पोलिस आणि कामागार खात्याकडे केलेल्या तक्रारीत कंपनीने हे म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेय.

हिंसाचाराच्यावेळी हजारो आयफोन्सची लूट करण्यात आली. त्यामुळे प्रामुख्याने जास्त नुकसान झाले आहे. वेतन थकवल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रकल्पात गोंधळ घातला. त्यांनी तोडफोड करतानाच दगडफेकही केली. कोलार जिल्ह्यातील नारासापुरा इथे ही कंपनी आहे. कोलार जिल्ह्यातील नारासपुरा इंडस्ट्रीयल एरियामध्ये आयफोनचा हा प्रकल्प आहे.

आणखी वाचा- बंगळुरुत आयफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीत तुफान राडा, कर्मचाऱ्यांकडून तोडफोड; १२५ जणांना अटक

वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अन्य वस्तुंबरोबर फर्निचरचीही तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. मागच्या चार महिन्यापासून वेतन मिळाले नाही, म्हणून हे कर्मचारी आंदोलन करत होते. पोलिसांनी याप्रकरणी १२५ जणांना अटक केली आहे.

कर्मचारी हिंसाचार करत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यामध्ये कर्मचारी काचा, सीसीटीव्ही, पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या काचा आणि लाईट्स फोडताना दिसत आहेत. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या तोडफोडीत सहा गाड्यांचं नुकसान झालं आहे. तसंच बॅटरीला आग लावण्यात आली. याशिवाय सुरक्षारक्षक आणि मॅनेजरला मारहाण करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.