विस्तारवादी मानसिकता ठेवणाऱ्या चीनने १९५० साली तिबेटवर आक्रमण करुन तिबेटचा भूभाग बळकावला. सर्वसामान्य तिबेटी जनतेच्या मनात चीनबद्दल प्रचंड राग आणि संतापाची भावना आहे. जगाच्या वेगवेगळया भागात आजही तिबेटी नागरिक चीनच्या या दडपशाही विरोधात शक्य त्या मार्गाने आवाज उठवत असतात. आज सात दशकानंतर त्याच तिबेटच्या तरुणांनी पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या टेकडया ताब्यात घेऊन चीनला सणसणीत चपराक लगावली. या तिबेटीयन जवानांना भारतीय सैन्याने प्रशिक्षण देऊन युद्धकौशल्यात पारंगत केलं आहे. आज भारतामध्ये याच SFF युनिटच्या पराक्रमाची चर्चा आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

१९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर तिबेटी जवानांसाठी खास स्पेशल फ्रंटियर फोर्सची स्थापना झाली. पण त्या आधीपासून हे तिबेटीयन योद्धे गनिमी काव्याच्या युद्धकौशल्यात पारंगत होते. चीनच्या जुलमी, अत्याचारी राजवटीविरोधात या योद्ध्यांनी लढा दिला. त्यासाठी या तरुणांना कोणी प्रशिक्षित केले?, त्यांच्या सशस्त्र गटाचे काय नाव होते? ते आपण समजून घेऊया.

प्रतिकाराची सुरुवात
१९५० साली चीनने तिबेटवर आक्रमण करुन पूर्व तिबेटचा भाग बळकावला. यामध्ये अ‍ॅमडो, गोलोक आणि खाम हे प्रदेश होते. त्यावेळी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने तिबेटमध्ये वेगवेगळी धोरणं राबवली. ज्यामुळे सर्वसामान्य तिबेटीयन जनतेची जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली. त्यांच खच्चीकरण झालं. १९५५-५६ च्या सुमारास पूर्व तिबेटमधील जनतेनं चीनच्या या दडपशाहीविरोधात एकाचवेळी उठाव केला.

त्यावेळी चीनने आपल्या सैन्य शक्तीचा वापर केला. फायटर विमानांमधून तिबेटीयन जनतेची श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांवर बॉम्बफेक केली. आपल्या राजवटी विरोधात आवाज उठवतात या सूड भावनेतून हजारो तिबेटीयन नागरिकांची कत्तल केली. इतक्या क्रूर पद्धतीने चीनने तिबेटीयन जनतेचा आवाज दाबून टाकला.

१९५७ च्या सुरुवातीला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी विरोधात लढण्यासाठी गोम्पो ताशी यांच्या नेतृत्वाखाली ‘चुशी गँगड्रक’ या सशस्त्र गटाची स्थापना करण्यात आली. पूर्व तिबेटच्या रक्षणासाठी खास या सशस्त्र गटाची स्थापना करण्यात आली होती. पण पुढे १९५८ च्या मध्यावर संपूर्ण तिबेटच्या रक्षणसाठी हा गट कार्यरत झाला. त्यावेळी नॅशनल व्हॉलेंटियर डिफेन्स आर्मी असे या गटाचे नामकरण करण्यात आले. पण आजही ‘चुशी गँगड्रक’ या नावानेच हा गट ओळखला जातो.

१९५७-५८ च्या सुमारास अमेरिकेने तिबेटमध्ये घडणाऱ्या घडामोडींमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. अमेरिकेचे अधिकारी विद्यमान दलाई लामांच्या दोन बंधुंच्या संपर्कात होते. १९५६ च्या सुमारास अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष एसनहॉवर यांच्या प्रशासनाने तिबेटमध्ये चिनी सैन्याविरोधातील गटाला मदत करण्याचा निर्णय घेतला.