केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सीसॅट पूर्वपरीक्षेचा वाद केंद्र सरकारने काढलेल्या तोडग्यानंतर थंडावला असतानाच बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव यांनी पूर्वपरीक्षेच्या दिवशीच, रविवारी (२४ ऑगस्ट) राज्यात ‘रेल रोको’ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘रेल रोको’मुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकतील व त्यामुळे पूर्वपरीक्षा पुन्हा घ्यावी लागेल, अशा ‘अभद्र’ हेतूने हे आंदोलन होत असून बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलानेही यादव यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यूपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागणार आहे.
‘सीसॅट’ परीक्षेतील इंग्रजी विषयाशी संबंधित प्रश्नांवर आक्षेप घेत यूपीएससी परीक्षार्थीनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जोरदार आंदोलन चालवले होते. त्यावरून राजकीय वादंग उभे राहताच केंद्र सरकारने इंग्रजी विषयाचे गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा वाद मिटल्याचे चित्र असतानाच पप्पू यादव यांनी या मुद्दय़ाचे राजकारण करण्याची खेळी आरंभली आहे. ‘सीसॅट’ ही परीक्षा हिंदूी व प्रादेशिक भाषांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप करत त्यांनी रविवारी बिहारमध्ये ‘रेल रोको’ करण्याचा इशारा दिला आहे. राजदचे कार्यकर्ते पटना, गोरखपूर, दरभंगा स्थानकावर रेल रोको करणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचू न देणे हा या आंदोलनाचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, यामागे आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचेच राजदचे डावपेच आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा पोटनिवडणुकीत राजदशी हातमिळवणी करणाऱ्या सत्ताधारी जदयूनेही या आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे.
वेळप्रसंगी उपासमार सहन करून दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पप्पू यादव यांच्या आंदोलनाचा फटका बसणार आहे. कारण मोठय़ा प्रमाणावर बिहारमध्ये विद्यार्थी परीक्षेस मुकल्यास परीक्षा पुन्हा घेण्याबाबत सरकारवर दबाव निर्माण होईल. लोकसभा निवडणुकीत राजद व जदयूला बिहारमधील जनतेने धोबीपछाड दिली. दोन्ही पक्षांनी गमावलेला जनाधार विशेषत युवक मतदारांना पुन्हा मिळवण्यासाठी यूपीएससीच्या मुद्दा तापवण्याचे डावपेच आखले आहेत.
विरोधाआड राजकीय डावपेच!
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेबाबत परीक्षार्थीमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र, याच नाराजीचा फायदा घेऊन त्या मुद्याचे राजकारण करण्याचे खेळ विविध पक्षांची नेतेमंडळी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या या आंदोलनात उडी घेत अनेक राजकारण्यांनी आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न चालवला आहे.
सीसॅट परीक्षेला विरोध करणाऱ्या राष्ट्रीय अधिकार मंचचे उपोषण केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर जुलैमध्ये संपले होते. निलोत्पल मृणाल नावाचा विद्यार्थी उपोषणास बसला होता. सरकारच्या आश्वासनानंतरही उपोषण सोडू नये यासाठी सीसॅटविरोधी आंदोलनाचे मुख्य प्रणेते श्याम रूद्र पाठक यांनी निलोत्पलला विनंती केली होती. तरीही राष्ट्रीय अधिकार मंचने उपोषण संपवले. त्यानंतर पाठक यांच्या पुढाकाराने छात्र अधिकार मंच या नावाने काही विद्यार्थ्यांनी मुखर्जी नगरमध्ये आंदोलन आरंभिले. आपली शक्ती कमी झाली, हे लक्षात आल्यावर पाठक यांनी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहन करीत समान अवसर मंच स्थापन करून जंतर-मंतरवर ठिय्या मांडला. याच आंदोलना दरम्यान पप्पू यादव यांनी भेट दिली होती. श्याम रूद्र पाठकदेखील यावेळी उपस्थित होते. याच भेटीत यादव यांनी ‘रेल रोको’ करणार असल्याची घोषणा केली होती. ‘पक्ष बदलण्याबाबत आंदोलनकर्ते आमच्यापेक्षा फास्ट आहेत’ असा टोमणा यादव यांनी मारला़ अभाविप, राष्ट्रीय युवक काँग्रेस, आदी विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला़  आप नेते प्रा. योगेंद्र यादव यांनी या सर्वाना बाजूला सारत आंदोलनाची सूत्रे ताब्यात घेतली होती. परंतु सरकारच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.