देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी मुंबईतील वाद्रे रेल्वे स्थानक परिसरात हजारो मजूर जमल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच त्यांनी आपल्याला घरी जाऊ देण्याची मागणी केली होती. त्यांनतर आता बुधवारी दिल्लीतील काही मजूर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील काश्मीर गेटनजीक यमुना नदीजवळ रोजंदारीवर काम करणारे हजारो कामगार जमल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या अनेक दिवसांपासून यमुना नदीच्या किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं लोक राहत आहेत. दरम्यान, त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात येत असून त्यांची खाण्यापिण्याची सोय केल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हे मजूर कोणत्या कारणामुळे त्या ठिकाणी जमले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहेत. परंतु अशा घटनांमुळे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माहिती मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व मजुरांना त्या ठिकाणाहून हलवण्याचे आदेश दिले. या ठिकाणी जमलेल्या मुजरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना राहण्याची आणि खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता नाही. कोणीही उपाशी व्यक्ती आढळल्यास आम्हाला संपर्क साधा, अशा आशयाचं ट्विटही त्यांनी केलं.