पश्चिम बंगालमध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले असून त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कवी, धावपटू, अभिनेते, चित्रकार, विद्यार्थी यांच्यासह हजारो निदर्शकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
महाविद्यालय चौकातून निघालेला हा मोर्चा जवळपास अडीच कि.मी.चे अंतर कापून एक्स्प्लनेड येथे समाप्त झाला. राज्यात २०११ मध्ये नवे सरकार आल्यानंतर काढण्यात आलेला हा पहिलाच मोठा मोर्चा होता आणि त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
महिलांवरील वाढत्या गुन्ह्य़ांच्या निषेधार्थ गुरुवारी एक मेळावा घेण्यात आला होता. त्यामध्ये अभिनेत्री अपर्णा सेन, शिक्षणतज्ज्ञ सुनंदा सन्याल सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.
२४ परगणा जिल्ह्य़ातील उत्तरेकडील भागांत असलेल्या बारासत येथे एका महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याबद्दल त्या परिसरातील महिलांच्या रोषाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सामोरे जावे लागले होते.