जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात ३ जवान शहीद झाल्याचे ताजे वृत्त असून या दुर्घटनेत १ जवानही जखमी झाला आहे. माछिल सेक्टरमधील लष्कराच्या तळावर बर्फाचा डोंगर केसळल्याने या जवानांचा मृत्यू झाला आहे. हवालदार कमलेश सिंह (वय ३९), नाईक बलवीर (३३) आणि शिपाई राजिंदर (२५) अशी हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

अफगाणिस्तानात बुधवारी ६.२ रिश्टर स्केल क्षमतेचा शक्तीशाली भूकंप झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या अनेक जिल्ह्यात हिमस्खलनाचा इशारा सरकारी यंत्रणांनी दिला होता. या भूकंपाचा सर्वाधिक फटका बारामुल्ला जिल्ह्याला बसू शकतो तर कुपवाडा, बंदिपोरा, शोपियान आणि कारगिल भागात कमी फटका बसू शकतो असेही भाकित या यंत्रणांनी केले होते.

यापूर्वी, ५ जानेवारी रोजी झालेल्या अशाच एका हिमस्खलनाच्या घटनेत कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात अनेक स्थानिक लोक अडकून पडले होते. या अडकलेल्या लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतून एका ८ वर्षांच्या मुलाला आणि ५० वर्षांच्या व्यक्तीला वाचवण्यात आले होते. सर्वजण आपल्या खासगी वाहनाने या भागातून प्रवास करीत होते. या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत बीआरओचा एक अभियंता आणि ८ स्थानिक नागरिकांचा समावेश होता.