कर्नाटकमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे उजव्या विचारसरणीच्या एका व्यक्तीने राज्यातील तीन भाजपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. या प्रकरणासंदर्भात मंगळुरु पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या धर्मेंद सुरथकल यांनी हिंदू महासभेच्यावतीने वक्तव्य करताना या बेकायदेशीर बांधकामाविरोधात सुरु करण्यात आलेल्या मोहिमेला विरोध केला होता. पत्रकार परिषदमध्ये सुरथकल यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला होता. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि मंत्री शशिकला जोले यांच्याविरोधात वक्तव्य करण्यात आली. १० सप्टेंबर रोजी मैसूरमधील नंजगगुड परिसरामधील एक मंदिर या कारवाईअंतर्गत पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता स्थानिकांनी त्याला विरोध केला. या प्रकरणासंदर्भात बोलताना सुरथकल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “जर आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी महात्मा गांधींना मारुन टाकलं तर मुख्यमंत्री, येडियुरप्पा आणि जोले यांना काय वाटतं आम्ही त्यांना सोडून देऊ काय?,” असं सुरथकल यांनी म्हटल्याचं ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

रविवारी मंगळुरुचे पोलीस आयुक्त एन. शशि कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणास सुरथकल, राजेश पवित्रन आणि प्रेम पोलाली यांना हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष एल, के. सुवर्णा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. या तिघांविरोधात वेगवेगळ्या कलमांअंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा यांनी सुरथकल यांनी केलेल्या वक्तव्याशी हिंदू महासभेचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

कर्नाटक सरकारने २९ सप्टेंबर २००९ नंतर सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांना हटवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०१० साली दिलेल्या आदेशाचे पालन करत करावाई करत आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे काम केलं जात आहे. या संदर्भात वेळोवेळी न्यायालयामध्ये सुनावणीही झालीय.

ज्या नंजनगुड मंदिरावरील कारवाईमुळे राज्यामध्ये राजकीय वाद निर्माण झालाय ते मंदिर पाडण्यास अनेक राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी विरोध केला होता. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरमैय्या यांनी हिंदूंबद्दल भाजपाची नक्की काय भूमिका आहे यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलाय. राज्य सरकारने स्थानिकांनी चर्चा न करता कारवाई केल्याचा आरोप केला जातोय. हिंदूंविरोधातील या कारवाईसाठी भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांनी केलाय.