कच्छ जिल्ह्य़ात तीन भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह जाळून टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. सूड घेण्यासाठी हे हत्याकांड घडविण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
कच्छ जिल्ह्य़ातील रापार तालुक्यातील खेडुकावाद गावात या तीन भावांच्या मृतदेहांचे जळलेले अवशेष आढळले. सदर भाऊ ३० ते ४० वर्षे वयोगटातील होते, असे सीमा परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक ए. के. जाडेजा यांनी सांगितले.
सदर भावांची नावे सुरेश कोली, नरेश कोली आणि रामसंग कोली अशी असून हल्लेखोरांनी पिपराडा तपासणी नाक्यावरून प्रथम त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या केली, असे जाडेजा म्हणाले. या हत्याकांडाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह खेडुकावाद येथे जाळण्यात आले. मृत भाऊ आणि हल्लेखोर एकाच गावांतील आहेत.
सदर कोली बंधूंनी आपल्या नातेवाईकाची हत्या केली होती त्याचा सूड उगविण्यासाठी आरोपींनी या भावांची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. कोली बंधू शुक्रवारी अदेसर पोलीस ठाण्यात आले होते. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.