मौनी अमावास्येची पर्वणी साधणार
रविवारी येणाऱ्या मौनी अमावास्येनिमित्त येथील पवित्र संगमावरच्या महाकुंभमेळ्यात तीन कोटी भाविक शाही स्नानासाठी येण्याची अपेक्षा आहे.
अनेक महिला व मुलांसह सध्या येथे मोठय़ा संख्येने भाविक जमले असून गंगा आणि यमुनेपलीकडील भाविकही येथे येत आहेत. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील भाविकांचा समावेश आहे. मौनी अमावास्येचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे आलेल्या साधूंचे मकरसंक्रांतीनंतरचे हे दुसरे शाही स्नान असते. या साधूंचीही संख्या मोठी असते, असे अलाहाबादचे विभागीय आयुक्त देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले.
शाही स्नानाच्या काळात कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था भंग पावू नये म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरेक्यांचा संभाव्य हल्ला तसेच चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे सहा हजार एकर परिसरात कुंभमेळा सुरू असून तेथे विविध स्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्वानपथके तसेच बॉम्ब निकामी करणारी पथकेही या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.
रविवारी सकाळपासून या परिसरातील वाहनांच्या वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली असून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी कुंभमेळ्यातील गर्दीच्या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्याउपरही ते आल्यास इतर दिवसांप्रमाणे त्यांनी आपल्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची अपेक्षा करू नये, असे आवाहन कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी मणीप्रसाद मिश्रा यांनी केले आहे.