लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयामुळे भारतीय साहित्य व कला क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्नाड यांच्या निधनानंतर कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे एक दिवस सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयानं रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटकं सुजाण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ‘ययाती’, ‘हयवदन’ व ‘नागमंडल’ ही त्यांची नाटके प्रचंड गाजली. १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या ‘तुघलक’ या नाटकानं इतिहास घडवला. या नाटकामुळं त्यांचं नाव देशभरात गेलं.

अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही ते ओळखले जायचे. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.