आता ‘पॅन कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी लिंक करण्यासाठी केवळ तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अद्याप पॅन आधारशी लिंक केले नसले तर तुमच्या जवळ अद्यापही संधी आहे. कारण जर तुम्ही पुढील तीन दिवसांत अर्थात ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. कारण यापुढे सरकार यासाठी मुदत वाढ देण्याची शक्यता कमी आहे. सरकारने यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे.

‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक न केल्यास होणारे नुकसान

जर आपण ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर आपले पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे आपल्याला पॅन कार्ड पुन्हा बनवावे लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.

त्याचबरोबर जर तुम्ही आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द होण्यामुळे तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही. कारण कंपन्या करमर्यादेच्यावर असणाऱ्या पगारावर टीडीएस कापून घेतात. मात्र, तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास त्यांना हे करता येणार नाही. ज्यामुळे तुमच्या पगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन आणि आधार क्रमांक दोन्हीही असतील तर त्याला लिंक करुन घेणेच हिताचे ठरणार आहे.

‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक केल्याने होणारे फायदे

जर तुमचा पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक आहे तर तुम्हाला नवे बँक खाते सहजासहजी खोलता येणे शक्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला आयटीआर भरण्यासही यामुळे अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डिमॅट अकाऊंट खोलता येणे सोपे होईल. कारण, यासाठी पॅन आणि आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवे डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड मिळवणेही यामुळे सोईचे होऊ शकते.