जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये भारतीय सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात काल (मंगळवार)संध्याकाळपासून संघर्ष सुरु होता. आज पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. दहशतवाद्यांकडे असलेली एक सेल्फ लोडिंग रायफल सुरक्षा दलांनी ताब्यात घेतली आहे.

बडगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी संध्याकाळी परिसरात शोधमोहीम सुरु केली. बडगामच्या महागाम भागात संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष कारवाई पथकाने संयुक्तपणे दहशतवाद्यांशी संघर्ष केला.

अमरनाथा यात्रेवरील हल्ल्याला २४ तासही उलटून गेले नसताना बडगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर सोमवारी रात्री हल्ला झाला. अनंतनागमध्ये झालेल्या या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याने जवळपास १५ भाविक जखमी झाले. बडगाममधील दहशतवाद्यांविरुद्धची चकमक संपली असून सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहिम राबवण्यात येते आहे. यासोबतच बडगाममधील पोलीस बंदोबस्तातदेखील वाढ करण्यात आली आहे.