सुदानच्या दक्षिणेकडील तणावग्रस्त जोंगलेई प्रांतात जवळपास दोन हजार बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या तळावर असलेले तीन भारतीय शांतिसैनिक ठार झाले. गेल्या आठ महिन्यांत झालेला हा दुसरा हल्ला आहे.
बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात सुदानच्या दक्षिणेकडील प्रांतात असलेले तीन भारतीय शांतीसैनिक दुर्दैवाने ठार झाले, असे संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे राजदूत अशोक मुखर्जी यांनी सांगितले.
बंडखोरांनी हल्ला केला तेव्हा अकोबो येथील तळावर ४३ भारतीय सैनिक, सहा राजकीय मुत्सद्दी आणि अन्य १२ कर्मचारी होते. जवळपास ३० सुदानी नागरिकांनी या तळावर आश्रय घेतला असून त्यांना आपल्या हवाली करण्याची मागणी लू न्यूअर वंशाच्या युवकांनी केली. त्याला भारतीय सैनिकांनी नकार दिल्यानंतर बंडखोरांनी बेछूट गोळीबार केला, त्यामध्ये तीन सैनिक ठार झाले.
तथापि, या हल्ल्यातून १८ राजकीय मुत्सद्दी आणि अन्य कर्मचारी सुदैवाने बचावले. सुदानच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने या अधिकाऱ्यांना वाचविले, असे मुखर्जी म्हणाले.