विश्वाचा आजवरचा सर्वात तपशीलवार नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. प्लँक खगोल दुर्बिणीद्वारे टिपलेल्या निरीक्षणांवरून हा नकाशा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नकाशाचे आरेखन करण्यात भारताचे महत्त्वाचे योगदान आहे.
संजीत मित्रा, तरुण सौरदीप आणि त्यांचाच पदवी स्तरावरील विद्यार्थी आदित्य रोट्टी या तीन शास्त्रज्ञांचा विश्वाचा नकाशा तयार करणाऱ्या चमूमध्ये समावेश होता. आदित्य रोट्टी हा पदवीधर पुण्यातील आयुकाचा (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स) विद्यार्थी आहे.
आयुकामध्ये सुमारे दशकभर संशोधन करून तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रोग्रामने या नकाशा आरेखनात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषत: प्रस्थापित खगोलीय तत्त्वांमध्ये आणि प्रत्यक्ष निरीक्षणांमध्ये जे फरक आढळले त्यामागील सूत्रे शोधण्याचे काम या चमूने केला, अशी माहिती मित्रा यांनी दिली.
 युरोपीय स्पेस एजन्सी (ईएसए)च्या प्लँक या खगोल दुर्बिणीद्वारे विश्वाची काही छायाचित्रे घेण्यात आली. ‘बिग बँग’ लगतच्या कालावधीतील अवकाशाची काही चित्रे २१ मार्च रोजी पॅरिस येथे प्रसिद्ध करण्यात आली.  या चित्रांमधून काही औत्सुक्यपूर्ण माहिती पुढे आली आहे. विश्वाचे वय आजवर आपण गृहीत धरलेल्या वयापेक्षा थोडे अधिक असल्याचे आढळले आहे. नव्या नकाशावर सुमारे ३ लाख ७० हजार वर्षांपूर्वी आकाशामध्ये तापमानात बदल होत असल्याचे सुचविणारे ठसे आढळले आहेत.विश्वातील प्राचीनतम प्रकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड’मध्ये झालेले सूक्ष्म बदल साधारणपणे १३ अब्ज वर्षांपूर्वीचे असावेत, असे निरीक्षण पुढे आले आहे. तेव्हा विश्वाचे वय अत्यंत ‘कोवळे’ होते, ते काही लाख वर्षांचे होते, अशी माहिती संजीत मित्रा यांनी दिली. यामुळे विश्वाची रचना, त्याचे वय, तसेच विश्वाचे भविष्य उलगडण्यास मदत होईल, असे मित्रा यांनी स्पष्ट केले.   
भारतीय मुद्रा!
संजीत मित्रा, तरुण सौरदीप आणि त्यांचाच पदवी स्तरावरील विद्यार्थी आदित्य रोट्टी या तीन शास्त्रज्ञांचा विश्वाचा नकाशा तयार करणाऱ्या चमूमध्ये समावेश होता. आदित्य रोट्टी हा पदवीधर पुण्यातील आयुकाचा (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स) विद्यार्थी आहे.